अलिबाग
*अलिबाग आणि दूरदर्शन*
दूरदर्शनचं पहिलं निकट दर्शन अलिबागला जे.एस.एम. काॅलेजच्या लेडीज हाॅस्टेलवर रहात असताना झालं. साल होतं 1972/73.
आम्ही हाॅस्टेलवरील सर्व मुली लहान गावातून आलेल्या. मुंबई दूरदर्शन नुकतंच सुरू झालं होतं आणि टी. व्ही. सेट गावोगावी/घरोघरी अजून बसायचे होते. डेविड यांच्या आईस्क्रीमच्या दुकानात टी. व्ही. संच ठेवण्यात आला आणि संध्याकाळी तिथे आइस्क्रीम खायला येणारांची अलोट गर्दी होऊ लागली असं आम्ही ऐकून होतो. संध्याकाळी काही तासच टी.व्ही. सुरू असे. आम्ही त्या गर्दीत कधी गेलो नाही. तशी परवानगीही आम्हाला मिळाली नसती. पण नंतर काॅलेजच्या स्टाफने वर्गणी काढून टी.व्ही. संच घेतला.
मॅथ्स् च्या प्रोफेसर कु. मंगला क्षीरसागर या आमच्यासह हाॅस्टेलवर रहात. मुलींनी त्यांच्याकडे हट्ट धरला. "मॅडम आम्हाला एकदा टी.व्ही. बघायला न्या ना." मॅडमनी एक दिवस खरंच स्टाफच्या लोकांकडे आमच्यासाठी परवानगी मागितली. चक्क!! हाॅस्टेलवर प्रचंड उत्साह संचारला. आणि दुग्धशर्करा योग असा होता की त्या रात्री "फूल खिले हैं गुलशन गुलशन"मधे साक्षात् सुपरस्टार राजेश खन्ना यांची मुलाखत होती. बापरे. केवढा दुर्मिळ योग. तोपर्यंत सिनेनट एकतर सिनेमात दिसायचे नाहीतर फिल्मी मासिकात. असं समोरून समक्ष हसता-बोलताना बघायचं.... तेही राजेश खन्नाला !
मुली प्रचंड हरखून गेल्या होत्या. पण मॅडमनी कडक सुचना दिल्या. स्टाफरूममधे जाणार आहोत. स्टाफच्या लोकांना जराही त्रास होता कामा नये. नो काॅमेंट्स्, नो कुजबूज, नो हसणं-खिदळणं. पावलांचाही आवाज न करता चुपचाप येऊन बसायचं आणि चुपचाप उठून जायचं.
सगळ्यांनी एका धुंदीतच जेवणं उरकली आणि निघालो. जाऊन बघतो तर काय? टीव्हीच्या पडद्यावर खुद्द साहेब लुंगी नेसून खुर्चीत बसलेले. ज्या मुली राजेशच्या दिवाण्या होत्या, त्यांना आपलं दैवत समोर बघून स्वर्ग जणू दोन बोटे उरला. चेह-यावर मनमोकळं हसू आणि मान वाकडी करून डोळे मिचकावीत दिलेली स्टाइलिश उत्तरं.
दूरदर्शनचं हे पहिलंवहिलं दर्शन!
नंतर दर गुरूवारी छायागीत बघण्यासाठी मुलींचा जीव खालीवर होऊ लागला. अधूनमधून परवानगी मिळत असे. कालांतराने स्टाफच्या लोकांची आरंभीची उत्सुकता कमी होऊ लागली. मुलींना मात्र छायागीताची चटकच लागली होती. दर गुरूवारी "मॅडम प्लीज...मॅडम प्लीज" सुरू व्हायचं. मग मॅडम म्हणत, "बघा बुवा. तुमच्यासाठी टी.व्ही. लावला जाणार नाही. कुणी स्टाफची लोकं आलेली दिसली तर तुम्ही जा."
मग आम्ही काॅलेजच्या गेटकडे लक्ष ठेवून बसत असू. एखादी व्यक्ती हातात टाॅर्च घेऊन काॅलेजच्या आवारात आलेली दिसली की, ती समुद्राच्या दिशेने जातेय की स्टाफरूमच्या हे बघत बसायचं. ती व्यक्ती स्टाफरूमच्या दिशेला वळलेली दिसली की मुलींच्या मनात हल्लीच्या भाषेत आशेचे लड्डू फुटत. त्यानंतर जर स्टाफरूमच्या खिडक्याही प्रकाशमान झालेल्या दिसल्या, तर बघायलाच नको. "चला चला. कुणीतरी आलेत. टी. व्ही. सुरू झाला. मॅडम तुम्ही पण चला ." असा एकच कल्लोळ होई आणि सगळ्याजणी उड्या मारीत निघत छायागीत बघायला.
महत्वाची क्रिकेट मॅच असली की सगळ्याच विद्यार्थीवर्गाला ती बघायची असे. अशा वेळी टी. व्ही. सेटची स्थापना एका मोठ्या क्लासरूममधे केली जायची आणि प्रेक्षकांची तुडुंब गर्दी व्हायची. त्या वेळी आम्हाला तिथे शिरकाव करणेही कठीण असे. तरीपण खूप धडपड करून गर्दीत घुसायचं आणि माना उंचावून मॅच बघायची अशी गंमत असे. त्यावेळच्या छायाचित्रणाचा दर्जा सुमार असे. उडालेला बाॅल विटीसारखा दिसायचा. आणि मधे मधे व्यत्त्यय तर ठरलेलाच. गावस्कर, इंजिनीअर, करसन घावरी, प्रसन्ना, बेदी,किरमाणी यांचा तो जमाना. टीव्हीवर बघूनच आम्ही त्याना ओळखायला शिकलो खरं तर.
हळूहळू दूरदर्शनचा खूपच प्रसार झाला. पण त्या पहिलेपणाची गंमत काही निराळीच. आणि ती गंमत अशा प्रकारे अलिबागशी निगडीत आहे.
सौ. गौरी बावडेकर (कु. जयश्री साठे)

Comments
Post a Comment